| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील चिकणी गावातील नागरिकांच्या लोकवर्गणीतून व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यांने चिकणी गावात उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीमधील भव्य, आकर्षक तटबंदी असलेल्या शिवस्मारकाचे लोकार्पण चिकणी गावातील ग्रामस्थांच्या हस्ते शनिवारी(दि.3) करण्यात आले. दरम्यान आदल्या दिवशी शुक्रवारी दुपारी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक चिकणी गावातून काढण्यात आली होती.
सिंहासनाधीश्वर छ. शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची सकाळी विधिवत स्थापना केल्यानंतर पाली येथील वेदाचार्य धनंजय गद्रे गुरुजी यांनी गणेश पूजनाने या धार्मिक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने संध्याकाळी रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांच्या मराठमोळ्या पोवाड्यांनी रंगत आणली. चिकणीतील बालकलाकार ईशान सचिन देवरे याने सादर केलेल्या अफजलखान वधाच्या पोवाड्याला सर्वांनी बक्षिसांचा वर्षाव करीत उत्स्फूर्तपणे दाद दिली. याप्रसंगी सचिन कळसकर, विजय देवरे, बाळकृष्ण देवरे, सतीश भोसले, विनायक देवरे, प्रा. सुनील देवरे, विश्वनाथ य. देवरे, संतोष शिंदे, मच्छिंद्र देवरे, मारुती देवरे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, संतोष कोळी, सीताराम देवरे, लक्ष्मण भोसले, अतुल काळे, राजाराम देवरे, रमेश देवरे, नरेश देवरे, श्रिरंग देवरे, किसन देवरे, दिपक देवरे, रामचंद्र द. देवरे, अशोक भोसले आदींसह चिकणी गावातील ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले.