। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील खारआंबोली ग्रामपंचायत हद्दीमधील जल जीवन मिशन योजनेंतर्गत आंबोली नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. आंबोली ग्रामपंचायतची नवीन इमारत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मृती योजनेंतर्गत 18 लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली होती. या नवीन इमारतीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले.तर रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद सेस अंतर्गत आंबोली अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी आठ लाख 50 हजार रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद सदस्या नम्रता अजित कासार व आंबोली ग्रामपंचगयत सरपंच शिल्पा संतोष मोकल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी सभापती अशीका ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य अनंत ठाकूर, संतोष मोकल, माजी सरपंच अजित कासार, ग्रामपंचायत सदस्य नूतन चव्हाण, दुर्गा गुंड, आदेश भोईर, उपसरपंच मुसद्दीक तलवस्कर, माजी सभापती चंद्रकांत कमाने, माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप केने, रामजी भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंडित पाटील यांनी आपल्या भाषणात, आंबोली ग्रामपंचायतीसाठी रायगड जिल्हा परिषद मार्फत जास्तीत जास्त निधी दिला गेला आहे. यापुढेही निधीची कमतरता भासू देणार नाही. ग्रामपंचायत इमारतीचा वरचा मजला बांधण्यासाठी व अंतर्गत सजावटीसाठी आमदार जयंत पाटील यांच्या फंडातून मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन दिले. खारआंबोली मुख्य रस्त्यापासून अंतर्गत जोडरस्त्याला निधी प्राप्त करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुका चिटणीस मनोज भगत यांनी ग्रामपंचायतीमधील सर्व कामे उत्तम दर्जाची असून, सरपंच शिल्पा मोकल यांच्या कारकीर्दीत सर्वोत्कृष्ट कामे झाली असून, हा विकासकांचा झंझावात ते अविरत सुरु ठेवतील, असा आशावाद यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी मुरुड तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी माजी आमदार पंडित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे खारआंबोली ग्रामपंचायतीस स्वतंत्र कार्यालय बांधून मिळाले आहे. याचा सर्व ग्रामस्थांना फायदा होणार असून, सर्व प्रशासकीय कामे येथून मार्गी लागणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदेश भोईर यांनी केले. कार्यक्रमासाठी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.