| माणगाव | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने माणगाव तालुक्यातील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उतेखोल शाळेत मचारिझेन फाउंडेशनच्यावतीने आधुनिक वॉटर फिल्टर यंत्रणा बसवण्यात आली आहे. या फिल्टरचे लोकार्पण गुरुवार दि.1 जानेवारी 2026 रोजी एका विशेष कार्यक्रमाद्वारे उत्साहात करण्यात आले.
या कार्यक्रमास चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर एक उत्तम माणूस म्हणून घडण्याचे संस्कार रुजवण्यावर भर दिला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थी भारावून गेले. कार्यक्रमाचे विशेष पैलू: बौद्धिक मार्गदर्शन: फाउंडेशनचे क्वालिटी हेड सचिन वाघ यांनी मुलांच्या जडणघडणीत वाचनाचे महत्त्व सांगतानाच वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष सतीश काळे यांचीही विशेष उपस्थिती होती. कलाविष्कार: शाळेच्या विद्यार्थ्यांनी मवीरताफ या विषयावर शौर्यगाथा सांगणारी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. आरोग्य जाणीव: शुद्ध पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे अध्यक्ष लक्ष्मण जंगम व मुख्याध्यापक अमोल जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता सविता निंबाळकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. चारिझेन फाउंडेशनने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







