पनवेल-उरणलमध्ये पावसाची संततधार

। पनवेल । वार्ताहर ।
रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल आणि उरण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. पहाटेनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे पनवेल परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. जेएनपीटी या राष्ट्रीय महामार्गावर उलवे येथे पुन्हा पाच फुटांपर्यंत पाणी साठले होते. परिणामी, सकाळी कार्यालयात जाणार्‍या नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.

कुलाबा वेधशाळेने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्‍यानंतर कालपासूच पनवेल परिसरात ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट सुरू होता. सोमवारी (दि.12) रात्रीपासून पनवेल आणि उरण परिसरात पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पहाटेनंतर पावसाने चांगलाच जोर पकडला. पावसासह सोसाट्याचा वारा असल्यामुळे उरण तालुक्यातील गावांमध्ये सोमवारी घराची भिंत कोसळली.

पनवेल परिसरातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर काळुंद्रे रेल्वे बोगद्याखालील रस्ता पाण्याखाली गेला होता. रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी आल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. कळंबोली सेक्टर 6 येथील उद्यानांमध्ये पाणी भरले होते. सर्व खेळण्यांच्या ठिकाणी पाणी साठले होते. तसेच मुंब्रा-शिळफाटा रस्त्यावर कळंबोली स्टील मार्केटसमोर पाणी साठले होते. फूडलँड कंपनीसमोरील रस्ता जलमय झाल्यामुळे अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होता, पण दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.


24 तासांमध्ये 62 एमएम पावसाची नोंद
24 तासांमध्ये पनवेल आणि उरणमध्ये 62 एमएम इतक्या पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 24 तासांत पनवेलमध्ये 46 एमएम आणि उरणमध्ये 17 एमएम इतक्या पावसाची नोंद झाली होती, परंतु या वर्षी त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Exit mobile version