संततधार पावसाने पनवेल पाण्यात

आदई, कळंबोलीत नागरिक त्रस्त

। पनवेल । वार्ताहर ।

गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तालुक्यातील आदई आणि कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेक वाहने पाण्याखील गेली होती. कळंबोलीत 23 ठिकाणी पाणी खेचण्यासाठी मोटर पंप तैनात केले आहेत.

पनवेल आणि परिसरात शनिवारपासून पावसाने आपली संततधार सुरु ठेवली आहे. शनिवार आणि रविवार विकेंड असल्याने अनेकांनी पावसाचा आनंद घेतला. पनवेल शहरातील तालुका पोलीस ठाणे परिसर, मिडल क्लास सोसायटी, टपाल नाका, ठाणा नाका अशा सखल भागात पाणी साचतेच, पण कधीही पाणी न साचणार्‍या लाईन आळी सारख्या ठिकाणी देखील पाणी साचून राहिले होते. कळंबोली वसाहत, कामोठे वसाहत या ठिकाणी तसेच आदई गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळाले.आदई येथे इमारती बांधण्यात येत आहेत. या इमारती बांधताना पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन केले गेले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. इमारतीच्या आवारात दोन फूट पाणी साचल्याने वाहन चालकांना त्याचा फटका बसला. सुट्टी असून नागरिकांना काळजीपोटी बाहेर पडता आले नाही. दरम्यान, काहींनी मात्र विकेंड चांगलाच एन्जॉय केल्याचे पाहायला मिळाले.

कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे कळंबोली वसाहत पूर्णतः जलमय झाली. वसाहतीमधील साचलेले पाणी खेचण्यासाठी बसवण्यात आलेले सिंग हॉस्पिटल जवळील पंप हे रात्रभर बंद राहिल्याने पाणी कळंबोली वसाहतीत पूर्णता साचले. तीन ते साडेतीन फूट उंचीपर्यंत पाणी साचल्याने अनेकांच्या घरातही पाणी शिरले. एलआयजी भागातील साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकल व चार चाकी वाहनही पाण्यात बुडाल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी आपल्या रिक्षा व दुचाकी सुरक्षित स्थळी नेल्या. नागरिकांना झालेल्या या त्रासाचे मात्र देणे घेणे ना सिडकोला ना महापालिकेला.

Exit mobile version