पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!

वेळेत तपासणी न केल्याचा आरोप; प्रसूतीनंतर नर्सला शिवीगाळ, मारहाण

| पेण | प्रतिनिधी |

प्रसूतीकळांनी महिला अक्षरक्षः विव्हळत असताना डॉक्टरांनी वेळेत रुग्णालयात येऊन तपासणी केली नाही, असा गंभीर आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, प्रसूतीकळा असह्य झालेल्या महिलेची सुदैवाने सुखरुप प्रसूती झाली. परंतु, त्यानंतरही वाद थांबला नाही. प्रसूतीनंतरच्या उपचारावरुन ऑनड्युटी नर्ससोबत असभ्य वर्तन करुन तिला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास गौरी देवजी कडू या प्रसूतीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी ऑनड्युटी असलेल्या नर्सने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा सोनावणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर नियमानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांमार्फत डॉक्टरांना लेखी कॉल पाठविण्यात आला. आरोपानुसार, लेखी कॉल देऊनही डॉ. सोनावणे रुग्णाला तपासण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत. उलट रुग्णाला अलिबाग येथे हलविण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार ऑनड्युटी डॉक्टर मराठे यांनी रुग्णाला पुढे हलविण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, दरम्यानच्या काळात प्रसूतीकळा वाढल्याने रुग्णाची रुग्णालयातच प्रसूती करणे आवश्यक झाले.

यानंतर पुन्हा डॉ. सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा तसेच लेखी कॉल पाठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते रुग्णालयात आले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना बोलावण्यासाठी गेले असता त्यांच्याशी कथितरित्या शिवीगाळ व असभ्य वर्तन करण्यात आले आणि रुग्णालयात येण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, रुग्णाची प्रसूती झाली. त्यानंतर डॉ. सोनावणे रुग्णालयात आले. प्रसूतीनंतर रुग्णाला टाके घालण्याची जबाबदारी डॉक्टरांची असताना त्यांनी संबंधित नर्सला टाके घालण्यास सांगितले आणि तिच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच संबंधित नर्सने मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी छत्रीने तिच्या हातावर मारल्याचा आणि असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित नर्सने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार शुभ्रा शिरगावकर या पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर अरसळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की दोन्ही कर्मचाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याशिवाय नेमके काय घडले हे सांगता येणार नाही. घटनेची माहिती घेऊन वरिष्ठांना कळिवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर पिडीत निर्स ने कृषीवल शी संवाद साधताना सांगताना सांगितले की, प्रामाणिकपणे काम करुन ही अशा प्रकारचा त्रास होत असेल तर आम्ही नक्की काम करायचे की नाही असा प्रन उद्भवत आहे. वरिष्ठांकडून जर आम्हाला सुरक्षततेची हमी नसेल तर या पुढे काम करणे कठीण होईल.

Exit mobile version