विद्यापीठ स्तरावर जलविषयक अभ्यासक्रमाचा समावेश

उदय सामंत याची घोषणा
। चिपळूण । वृतसंस्था ।
आगामी काळात विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रमात जलविषयक अभ्यासांचा समावेश होईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पबचत सभागृहात एक दिवसीय जलकार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ते म्हणाले की, माझ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फ राज्यभरात जलसाक्षरता व जलशक्ती अभियान राबवण्यात येईल. जिल्ह्यात पाणी वापर संस्था व जलदूतांची नेमणूक करून वर्षअखेरीपूर्वी जलपुरूष राजेंद्रसिंह राणा व जलनायक किशोर धारिया यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठात बैठक घेऊ. तसेच जलशक्तीसाठी सर्वपक्षीय राजकीय ताकद उभी करण्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
यापुढे ते म्हणाले की, विद्यापीठात जलयुक्त अभ्यासक्रम करण्यासंदर्भात आताच कुलगुरुंशी बोललो. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनीही तयारी दर्शवली. ते अभ्यास करतील व पुढील वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होईल. या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनासाठी राजेंद्रसिंहांची तारीख घेऊन ठेवण्याची सूचनाही त्यांनी यासमयी केली.
या वेळी जलपुरुष राजेंद्रसिंह राणा, जलनायक किशोर धारिया, माजी आमदार बाळ माने, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी उपस्थित होते.

Exit mobile version