| रत्नागिरी | प्रतिनिधी |
भारमान कमी असल्यामुळे एसटीच्या बसफेऱ्या आता रद्द केल्या आहेत. मात्र, एसटीला खरा फायदा हा यात्रा, जत्रा, उत्सव याच्यातून होताना दिसत आहे. यंदा भराडी देवी यात्रा आणि कुणकेश्वर महाशिवरात्र यात्रेच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 52 लाख 11 हजार 385 रुपये फायदा झाला आहे. यंदा एसटीने दोन्ही यात्रेंसाठी चांगले नियोजन केल्याने प्रवासी आकर्षित झाले होते.
सामान्य प्रवाशांना एसटी एकमेव दळणवळणाचे साधन आहे. त्यातच एसटीकडून प्रवाशांना सवलती मिळाल्यानंतर एसटीचा डोलारा आर्थिकदृष्ट्या सावरू लागला आहे. महिलांसाठी 50 टक्के तिकीट सवलत दिल्यापासून एसटी थोडीफार सावरू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदा आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या उत्सवासाठी एकूण 72 हजार 263 भाविक प्रवासी होते. यासाठी 1406 फेऱ्या विविध एसटी आगारातून सोडल्या. यातून 23 लाख 61 हजार 655 रुपये उत्पन्न मिळाले. महामंडळाच्या वतीने गतवर्षी या यात्रेतून 24 लाख 42 हजार 905 इतका आर्थिक फायदा झाला होता. यंदा 81 हजार 250 रुपयांची घट झाली आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील महाशिवरात्र यात्रा सात ते अकरा मार्च या कालावधीमध्ये साजरी झाली. तेव्हा एसटीच्या 1184 फेऱ्यांमधून 68 हजार 235 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे 28 लाख 49 हजार 730 रुपये फायदा झाला. गेल्यावर्षी 61 हजार 758 प्रवाशांनी प्रवास केला होता. तेव्हा 24 लाख 75 हजार 680 रुपये इतका फायदा झाला होता.