उरणमधील चारही रेल्वे स्थानकांवर गैरसोयी

रेल्वे, सिडकोविरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट

| चिरनेर | प्रतिनिधी |

सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उरण-खारकोपर दरम्यानच्या स्थानकात सोयीऐवजी गैरसोयीचे अधिक असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2024 रोजी उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण-खारकोपरदरम्यान प्रवासी वाहतुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, नव्याने सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, रांजणपाडा या चारही स्थानकात भेडसावणार्‍या अनेक समस्यांमुळे दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी त्रस्त झाले आहेत.

सध्या रेल्वे मार्गावर सकाळपासून रात्री 9.30 वाजेपर्यंत फक्त 20 गाड्याच सोडण्यात येत आहेत. रात्री 9.30 नंतर लोकलच नसल्याने हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. स्थानकात पाण्याची सोय उपलब्ध नाही. स्थानकांच्या साफसफाईसाठी ठेकेदांराची नेमणूक केली नसल्याने चारही स्थानकातील साफसफाईची कामे मागील 2-3 महिन्यांपासून ठप्प झाली आहेत. साफसफाईअभावी स्थानक परिसर आणि शौचालयच नव्हे तर, कार्यालयेही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासन, सिडको परस्परांकडे बोटं दाखवत आहे. पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने पहिल्याच पावसात उरणच्या भुयारी मार्ग पाण्याखाली गेला होता. पाणी उपसण्यासाठी लावण्यात आलेले सहाही पंप निकामी ठरु लागले आहेत. त्यामुळे मात्र प्रवाशांना सबवेमधून पाण्यातून ये-जा करावी लागते. स्थानकात वाहनांच्या पार्किंगसाठी आकारण्यात येत असलेले दर प्रवासी व वाहन चालकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे पार्किंगसाठी ठेकेदार आणि प्रवासी यांच्यातील संघर्ष होत आहे. आता तर स्थानकातील विषारी सापांचा वावर प्रवाशांसाठी चिंतेत भर टाकणारा ठरु लागला आहे.स्थानक परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्हीच्या आवश्यकता आहे. मात्र, तशी व्यवस्था नसल्याने भुरट्या चोरांचे चांगलेच फावले आहे.

प्रवाशांना भेडसावणार्‍या या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी रेल्वे व सिडको कानाडोळा करीत असल्याने चारही स्थानकांवरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये रेल्वे व सिडकोविरोधात संतापाची लाट पसरली आहे.

Exit mobile version