। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल हे मुंबई महानगर प्रदेशातील वेगाने विकसित होणारे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. मात्र, येथील स्थानकातील नव्या पादचारी पुलांमुळे प्रवाशांना दररोज 120 पेक्षा अधिक पायऱ्या चढाव्या-उतराव्या लागत असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अंतर्गत दुमजली कंटेनर मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीसाठी या पुलांची उंची वाढविण्यात आली आहे. मात्र, या रेल्वेच्या विकासकामाचा फटका प्रवाशांना बसत असून, स्थानकात तातडीने आधुनिक सुविधा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेल रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलामुळे प्रवाशांना दररोज 120 पेक्षा अधिक पायऱ्या चढण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अंतर्गत दुमजली कंटेनर मालवाहू गाड्यांच्या वाहतुकीसाठी पुलाची उंची वाढविण्यात आल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणचा एक पादचारी फुल 64 व दुसरा 44 पायऱ्यांचा पूल आहे. सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी इतक्या मोठ्या संख्येने पायऱ्या चढणे अनेकांसाठी कष्टदायक ठरत आहे. विशेषतः वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला तसेच जड सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः दमछाक होत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार सुरेंद्र नेमळेकर यांनी पनवेल स्थानकात तातडीने एस्कलेटर आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, तर सामाजिक कार्यकर्ते संजय गांगनाईक यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी बंद असलेला भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रेल्वे प्रशासनाचे सकारात्मक संकेत
या मागणीची दखल घेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला गांनी प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने लाखो प्रवाशांचे लक्ष रेल्वे प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले असून, एस्कलेटर, लिफ्ट आणि भुयारी मार्गाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
