| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील प्रशासकीय भवनातील सेतू केंद्रात ऑनलाईन कामकाजामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. ऑनलाईन पावती घेण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना अनेक तास प्रतिक्षा करावी लागते. अनेकदा इंटरनेट सेवा रखडल्याने अथवा साईट स्लो असल्यामुळे प्रक्रिया लांबते. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाया जातो.
श्रीवर्धन तालुक्यातील दिघीपासून कोलमांडला या दुर्गम भागातून अनेक नागरिक सेतू केंद्रात विविध दाखले मिळवण्यासाठी येतात. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी लागणारे उत्पन्न दाखला, जात दाखला, रहिवासी दाखला अशा विविध प्रमाणपत्रांसाठी सेतू कार्यालयाची गरज भासते. मात्र, हे काम आता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केले जात असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. एस.टी. आणि मिनी डोअर या वाहनांतून नागरिक श्रीवर्धनला पोहोचतात. मात्र, तिथेही त्यांना केवळ ऑनलाईन पावती प्रक्रियेमुळे हेलपाटे मारावे लागत आहेत. यावर तातडीने तोडगा काढावा. तसेच, पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पावती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे होणारा त्रास टळेल आणि नागरिकांचे वेळेत काम होईल, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.







