। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
विधानसभा निवडणुकीचे साहित्य पोहचविण्यासाठी तसेच निवडणूक कर्मचार्यांची ने-आण करण्यासाठी बुधवारी (दि.20) राज्य परिवहन मंडळाच्या बसेस वापरण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीला मतदानासाठी जातांना व इतर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. यावेळी बस स्थानकात तसेच नाक्यावर प्रवासी व मतदार एसटी बसची वाट पाहत ताटकळत उभे होते. नाइलाजाने नागरीकांना खासगी वाहनांने जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत असंतोष व्यक्त केला. काही मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी रिक्षा, मिनिडोअर व खासगी वाहनांची सोय होती. मात्र, दुसर्या गावाला मतदानासाठी जाणार्या मतदारांना वाहनांची सोय नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली होती.
सकाळी लवकर खासगी वाहनाने मुंबईवरून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गोमाशी या गावी आलो. मतदानाचा हक्क बजावल्यावर पुन्हा पालीकडे जाण्यास निघालो असता कोणतेच वाहन उपलब्ध नव्हते. खूप वेळ ताटकळत रहावे लागले. अखेर खासगी वाहनाने जावे लागले. शासनाने मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करणे किंवा एसटी बससेवा सुरळीत ठेवणे आवश्यक होते.
– विश्वास सुतार, मतदार, गोमाशी