| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा परिसरातील घाटमाथ्यावर जाणार्या प्रवाशांसाठी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दांडफाटा येथे एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसला थांबा दिला आहे, मात्र तरीही काही बस याठिकाणी थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. शाळांना उन्हाळ्याची सुटी, त्यात लग्नसराईचे दिवस असल्याने गावाकडे जाणार्या प्रवाशांची वर्दळ असते. बस थांबली नाही, तर मनस्ताप सहन करावा लागत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करत आहेत. रसायनीत तसेच पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दांड फाटा येथे अति जलद वगळता सर्वसाधारण एसटी थांबा आहे. मात्र काही वाहक त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या ठिकाणी वाहतूक नियंत्रक नेमवा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.