मुरुड आगाराच्या कारभाराबाबत नाराजी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक नंबरचा असलेल्या मुरुड एसटी आगार सध्या भंगार एसटीमुळे प्रसिद्ध होत आहे. आगारात असलेल्या सर्व गाड्या अवस्था बिकट झाली आहे. या आगारात असलेल्या भंगार गाड्यांमुळे होणार्या नागरिकांची गैरसोय कधी थांबणार, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
मुरुड जंजिरा हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातून पर्यटक एसटीतून ये-जा करीत असतात. सध्या डेपोमधील गाड्यांची अवस्था आवारात असलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण त्यामुळे पावसात पडलेले खड्डे यामुळे अधिकच डेपो फेमस होत आहे. एसटी प्रवाशांसाठी नवीन गाड्यांची मागणी केली होती. मुरुड पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनीही डेपोची अवस्था सुधारावी, नवीन गाड्यांची मागणी अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊन बंद डोपो करण्याचा इशारा दिला होता. तद्नंतर नवीन एमएस बॉडीच्या सहा गाड्या आल्या. पण, त्या अपुर्या पडत असल्याने जुन्या गाड्या रस्त्यावर धावत आहेत. या गाड्यांच्या छतांना अनेक छिद्रे पडलेली असताना भरपावसात गाडी प्रवासासाठी वापरण्यात येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. काहीतर गाड्या मध्येच बंद पडत आहेत, त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास कधी थांबणार, असा प्रश्न प्रवासी व सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
गुरुवारी मुंबईवरुन मुरुड येणारी गाडी क्रमांक एम.एच.14 बी.टी.3058 ही गाडी रात्री 9 च्या दरम्यान पेण येथे बंद पडली. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटीतून प्रवास करायचा का नाही, हाही प्रश्न प्रवासी विचारत आहेत. एसटी बसेस नीटनेटक्या नसल्याने पर्यटकांची व प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. प्रवाशांचे प्रमाण वाढवावयाचे असल्यास नवीन गाड्या डेपोत आणण्याची आवश्यकता आहे.
गुरुवारी मुंबईवरुन मुरुडला येणारी एसटी पेण येथे तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती व त्याआधी गाडीला छिद्रे असल्याने पावासात प्रवाशांना त्रास होऊ लागल्याने ती एसटी पेण डीव्हीजन येथे देण्यात आली आहे. सध्या 15 एमएस बॉडीच्या नवीन गाड्या आपल्या डेपोकरिता देण्यात आल्या आहेत. तर, जुन्या 10 ते 12 गाड्या उपलब्ध आहेत.
– राहुल शिंदे, आगार व्यवस्थापक, मुरुड