पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल एसटी आगारातील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. येथील पाणपोई ही बिल्डरने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमागे झाकली गेल्याने ती प्रवाशांना सहज दिसत नाही. परिणामी वाढत्या उष्णतेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, पनवेल आगारात सावलीचीही अपुरी व्यवस्था असल्याने प्रवासी झाडांच्या आडोशाला बसून वेळ काढताना दिसत आहेत. विशेषतः उरणकडे जाणाऱ्या प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, प्रवेशद्वारावर खासगी वाहनांना बंदी असतानाही काही वाहनांची सर्रास ये-जा सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पाणपोईचा मोठा व स्पष्ट फलक लावणे, सावलीची योग्य व्यवस्था करणे आणि खासगी वाहनांवर कडक कारवाई करणे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Exit mobile version