। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणारा कोन सावळा रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने या रस्त्यावरुन वाहने भरधाव चालवली जात आहेत. याच रस्त्यावर कसळखंड, नारपोली, देवळोली, सावळा आदी गावे येत असल्याने ग्रामस्थांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरुन औद्योगिक क्षेत्राकडे ये-जा करणारी अवजड वाहने, कंपन्यांच्या बस व इतर वाहने भरधाव चालवली जात असल्याने अपघात होत आहेत. दरम्यान, देवळोली थांब्याजवळ वळणदार रस्ता असून वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने सुसाट चालवली जातात. त्याकरिता देवळोली थांब्यावर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी देवळोली ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रही दिले आहे.