वार्षिक महसुलात 2198.23 कोटींची वाढ
| पणजी | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 2022-23 या आर्थिक वर्षातील महसुलात 2198.23 कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सोमवारी आमसभेत देण्यात आली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नियमन परिषदेवर अरुण धुमल व अविषेक दालमिया यांची बिनविरोध फेरनिवड झाली, तर माजी कसोटीपटू प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेटपटू संघटनेचा प्रतिनिधी या नात्याने परिषदेतून पायउतार झाला.
बीसीसीआयची 92वी वार्षिक आमसभा सोमवारी उत्तर गोव्यातील वागातोर येथे झाली. आमसभेला प्रज्ञान ओझा याच्या निर्णयाची माहिती देण्यात आली. ओझा याच्या जागी लवकरच आयसीए प्रतिनिधी नियुक्त केला जाईल. प्राप्त माहितीनुसार, ओझा याने वैयक्तिक कारणास्तव पद सोडत असल्याचे कळविले आहे. आमसभेत महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) वेगळी परिषद नियुक्त करण्याचा मात्र निर्णय झाला नाही.
माहितीनुसार, बीसीआय आमसभेत खजिनदार आशिष शेलार यांनी सध्याच्या आर्थिक वर्षात मंडळाने 6,558.80 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केल्याची माहिती दिली. 2021-22 आर्थिक वर्षात बीसीसीआयचा महसूल 4,360.57 कोटी रुपये इतका होता. क्रिकेट प्रशासन चालविण्यासाठी बीसीसीआयकडून ईशान्य भागातील क्रिकेट संघटनांना प्रतिवर्षी 12.5 कोटी रुपये, तर पुदुचेरीला 17.5 कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णयही आमसभेत झाला.