। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने 6 पदके जिंकण्यात यश मिळवले असले तरी यावेळी भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे भविष्यात मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत मनू भाकर, सरबज्योत सिंग, स्वप्नील कुशाळे, भारतीय हॉकी संघ, नीरज चोप्रा आणि अमन सेहरावत यांनी भारताला पदक जिंकून देण्यात यश मिळवले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर अनेक खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑलिम्पिक वीरांच्या यशाचे भांडवल करण्यास भारतीय कंपन्या उत्सुक दिसत आहेत. स्पोर्ट्स मॅनेजमेंट फर्म मेडलाइन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंटचे सह-संस्थापक वरुण चोप्रा म्हणाले की , पॅरिस ऑलिम्पिकने भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन हिरो समोर आणले आहेत. यासोबतच नवीन शक्यतांची दारेही उघडली आहेत. मनू भाकर, नीरज, सेन आणि हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांचा उल्लेख करून ते म्हणाले की यांच्यावर बायोपिक चित्रपट तयार केला जाऊ शकतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
निरज चोप्राला भालाफेकमध्ये पुन्हा सुवर्णपदक जिंकता आले नसले तरी ब्रँड तज्ञांचा अजूनही त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूवर विश्वास आहे. नवी दिल्लीतील ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट शगुन गुप्ता म्हणाले की, त्यांची ब्रँड व्हॅल्यू त्यांच्या विजयापेक्षा खूप जास्त आहे. हॉकी संघाचा कर्णधार आणि या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा हरमनप्रीत सिंग हा ब्रँडिंगसाठी कंपन्यांचा सर्वात आवडता स्टार म्हणून उदयास आला आहे, कारण या हॉकी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची लोकप्रियता वाढली आहे.