पावसमधील पाणलोट क्षेत्रात वाढ
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
पावस येथील गौतमी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याची झडपे बंदिस्त केल्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला आहे. याचा फायदा आजूबाजूच्या विहिरींनाही होणार आहे.
पावस परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेता दरवर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वनराई बंधारे बांधले जात होते. समुद्रात वाहून जाणारे पाणी थांबवण्याचे काम या बंधार्याच्या माध्यमातून सुरू होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्यादृष्टीने या नदीवर दोन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्च करून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. पहिल्या वर्षी संबंधित ठेकेदाराने बंधार्याची झडपे बंद करून पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाण्याचा साठा होऊ शकतो हे दाखवून दिले होते. त्यात आणखी भर म्हणून नाम फाउंडेशन आणि विद्यमान आमदार यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 10 लाख रुपये खर्च करून नदीतील गाळ काढून पात्राच्या बाहेर टाकण्यात आला होता. त्यामुळे मागील वर्षी सुमारे दीड किमीपर्यंत चांगला साठा झाला होता. यावर्षी बंधार्याच्या झडपा बंदिस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुमारे 1 किमीपर्यंत चांगल्या तन्हेचे पाणलोट क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
दुसर्या टप्प्यातील गाळ उपशामुळे बंधारा परिसरात पाणी साठवण क्षेत्र निर्माण झाल्यामुळे यावर्षी उर्वरित म्हणजे दुसर्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम नाम फाउंडेशन आणि विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. अशी माहिती उपसरपंच प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.