डिझेल पुरवण्यात येणाऱ्या कंपनीकडून सवलत दरात वाढ
। मुंबई । प्रतिनिधी ।
येत्या 1 ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एसटी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरात प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाला सरासरी 3.23 लाख रुपये आणि वर्षाला सुमारे 11.80 कोटी रुपयांची बचत होणार आहे.
गेली 70 वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्याकडून डिझेल इंधन खरेदी करत आहे. सध्या दररोज एसटी महामंडळाला सरासरी 10 कोटी 78 लाख लिटर डिझेल लागते. एसटी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा खरेदी ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या. परंतु, एसटी महामंडळाने वारंवार विनंती करूनही कित्येक वर्ष या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता.
राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन-चार बैठका घेण्यात आल्या. तसेच डिझेल पुरवठा करणाऱ्या इतर खासगी कंपन्यासोबतही वाटाघाटी करण्यात आल्या. स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी करण्यात आली. या सर्वांचा परिणाम म्हणून संबंधित कंपन्यांनी सवलतीच्या दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार 1 ऑगस्टपासून मूळ सवलत दरात प्रति लिटर 30 पैसे वाढ करण्याचे संबंधित कंपन्यांनी मान्य केले आहे.
सध्या एसटीच्या 251 आगारात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सहाय्याने दररोज सरासरी 10 कोटी 78 लाख लिटर डिझेल इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या कडून पुरविण्यात येते. भविष्यात वाढत्या बसेसच्या संख्येमुळे डिझेल इंधनाची खपत देखील वाढणार आहे. त्यामुळे प्रति लिटर 30 पैसे वाढीव सवलत दिल्यामुळे वर्षाकाठी एसटी महामंडळाची अंदाजे 12 कोटी रुपयांची अतिरिक्त बचत होणार आहे.





