| चिरनेर | प्रतिनिधी |
मागील तीन महिन्यांपासून उरणच्या 672 मेगावॉट वायु वीज केंद्रातुन दररोज 450 मेगावॉट वीज निर्मिती केली जात आहे. यापुढे जर गेल व ओएनजीसीकडून 2.9 ते 3.3 एमएमएससीएमडी गॅसचा पुरवठा झाल्यास या केंद्रातुन सुमारे 600 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे राज्याच्या वीज तुटवडा कमी करण्यासाठी केंद्रातील अधिक मेगावॉट वीजनिर्मितीची मोलाची भर पडण्यास मदत होईल, अशी माहिती उरण वायु विद्युत केंद्राच्या सीजीएम विजया बोरकर यांनी दिली.
उरण-बोकडवीरा येथे विदेशी जर्मनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वायुवर चालणारा 672 मेगावॉट वीजनिर्मिती क्षमतेचा वायू विद्युत केंद्र प्रकल्प उभारण्यात आला आहे. या वीज निर्मिती प्रकल्पात चार गॅस टर्बाईन व दोन स्ट्रीम टर्बाईन असे एकूण सहा संच आहेत. याआधी या प्रकल्पाला गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार तीन एमएमएससीएमडीहून अधिक गॅसचा पुरवठा होत होता. त्यामुळे 672 मेगावॉट वीजनिर्मितीच्या या सहा संचातुन याआधी 600हून अधिक मेगावॉट विजेची निर्मिती केली जात होती. मात्र, त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आणि आवश्यक त्या देखभाली अभावी मागील काही वर्षांपासून वायु विद्युत केंद्रातील सहा पैकी तीन संच बंद पडले. त्यातच कंपन्यांकडूनही प्रकल्पाला गॅसचा पुरवठा तीन एमएमएससीएमडी ऐवजी 1.7 एमएमएससीएमडी इतक्या कमी प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे या वायु विद्युत केंद्राची वीजनिर्मितीची क्षमता 672 मेगावॉटवरुन 225-300 मेगावॉटपर्यंत अगदी निम्यावर येऊन ठेपली होती. मात्र, मागील दोन-तीन महिन्यांपासून प्रकल्पाला कंपन्यांकडून 1.7 वरुन 2.4 एमएमएससीएमडी इतका गॅस पुरवठा केला जात आहे. यामुळे वीज निर्मितीचा एक संच बंद असतानाही मागील दोन-तीन महिन्यांपासून उर्वरित पाच वीज निर्मितीच्या संचातुन दररोज 450 मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे.







