एसी, कुलरच्या मागणीत वाढ

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

उन्हाचा पारा वाढू लागल्याने गर्मीपासून बचावाकरिता एसी आणि कुलरचा वापर वाढला आहे. त्यामुळे नवीन एसी आणि कुलर खरेदीला ग्राहक पसंती दर्शवत आहेत. ग्राहकांची मागणी पाहता दुकानदारांनीही एसी आणि कुलर खरेदीवर विविध प्रकारच्या ऑफर जाहीर केल्या असून, जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी कंपन्यांनीही विविध प्रकारचे एसी आणि कुलर बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.

सध्या उष्णतेचा पारा 40 अंशांवर गेला आहे. दिवसेंदिवस पारा वाढताच राहणार असल्याचे मत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ‘एसी’ आणि ‘कूलर’ खरेदी करण्यास ग्राहकांनी सुरवात केली आहे. दररोज मोठ्या संख्येने एसी, कुलरची विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ग्राहकांचा दरवर्षी ‘कूलर’, ‘एसी’ घेण्याचा वाढता कल लक्षात घेऊन यंदा कंपन्यांनी त्यामध्ये असंख्य प्रकार आणले आहेत. रिमोटवरील ‘कूलर’पासून, डिजिटल ‘एसी’ तसेच इन्व्हर्टर एसी असे अनेक ‘फीचर्स’ बाजारात उपलब्ध आहेत. पंख्याच्या साह्याने गर्मीवर मात करता येत नसल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी थेट ‘एसी’ व ‘कूलर’च्या खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. बाजारात कूलरच्या किमती पाच हजारांपासून 20 हजार रुपयांपर्यंत आहेत, तर एसी 25 हजारांपासून उपलब्ध आहेत.

एसीची मागणीही वाढली
आधी एसी हा शब्द जरी उच्चारला तरी तो किती महाग आहे, असा विचार नागरिकांच्या मनात डोकावत होता. शिवाय, उन्हाळ्यात वाढीव वीज बिलाचा आधीच नागरिक धसका घेत असत; पण काही वर्षांत तांत्रिक वस्तूंच्या किमती झपाट्याने कमी झाल्या आहेत. नवनवीन फायनान्स कंपन्या अत्यल्प व्याजदरात हप्त्यावर एसीसारख्या वस्तू देत असल्याने नागरिकांचा एसी घेण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Exit mobile version