| चिरनेर | प्रतिनिधी |
बदलत्या वातावरणामुळे उरण शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यातील अनेक रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
उरण तालुक्यात डेंग्यू आणि व्हायरल तापाची साथ आली असल्याची माहिती उरण तालुका अधिकाऱ्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. शहरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी साचणारे पाणी आणि मोठ्या प्रमाणावर असलेले कचऱ्याचे ढीग यामुळे डासांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना पाण्याची भांडी कोरडी करण्याच्या व स्वच्छता राखण्याच्या सूचना तसेच ग्रामपंचायतींना सार्वजनिक गटारांची साफसफाई व फॉगिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात एक बैठकीही घेण्यात आली असून, लवकरच कारवाई केली जाईल, असे उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी सांगितले आहे.