नवी मुंबईत डेंग्यू संशयितांमध्ये वाढ

| नवी मुंबई | वार्ताहर |

नवी मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार बळावत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत शहरात डेंग्यू संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होताच नागरिकांमध्ये साथीच्या आजाराची लागण होते. शहरात नवीन बांधकामे सुरू आहेत. बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी अनेक दिवस साठवून ठेवल्याने त्या ठिकाणीदेखील या साथीच्या रोगांची उत्पत्ती होणाऱ्या डासांच्या आळ्या तयार होत असतात. तसेच, साठवणुकीच्या स्वच्छ पाण्यातही डास उत्पत्ती होत असते. घराअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत सप्टेंबरमध्ये 2,17,393 घरांना भेटी देऊन 404926 घराअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने तपासण्यात आली. त्यामध्ये 1179 स्थाने दूषित आढळून आली व ती नष्ट करण्यात आली. यामध्ये ॲनोफिलीस डास 151 ठिकाणी तर 963 ठिकाणी एडिस आणि क्युलेक्सचे 61 ठिकाणी असे 1179 ठिकाणी डास उत्पत्ती आढळली आहे. यंदा डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत मलेरियाचे 69 रुग्ण, तर सप्टेंबर 2023 पर्यंत 77 मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी डेंग्यूची लागण झालेले 10 रुग्ण होते यंदा आतापर्यंत 10 रुग्णांची नोंद पालिकेत आहे. मागील वर्षी सप्टेंबर 2022 पर्यंत 467 डेंग्यू संशयित रुग्ण आढळले होते, यंदा मात्र डेंगूसदृश्य रुग्णात वाढ झाली असून सप्टेंबर 2023 पर्यंत 900 रुग्ण आढळले आहेत.

Exit mobile version