। सुकेळी । वार्ताहर ।
सद्यपरिस्थितीत डिसेंबर महिना सुरु झाल्यापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात ढगाळ तसेच थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा या वातावरणामुळे नागोठणे विभागासह ऐनघर परिसरातील नागरीकांच्या आजारपणात मोठी वाढ झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
वातावरणात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली असून कधी ढगाळ वातावरण तर कधी वातावरणातील वाढलेली उष्णता यामुळे नागरीकांचे आरोग्य बिघडत आहे. यामध्ये अनेक नागरीकांना ताप, सर्दी, खोकळा, टायफाईड, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. या आजारपणामुळे सध्या सर्वत्र दवाखाने फुल्ल झाले आहेत. तरी, याबाबतीत कोणालाही ताप, सर्दी, खोकळा अशी काही लक्षणे असल्यास त्वरीत दवाखान्यात जाऊन योग्य ते उपचार घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन सुकेळी येथील जिंदाल रुग्णालयातील डॉ. मनिष रायकवार यांनी केले आहे.