नवी मुंबईत रुग्णसंख्येत वाढ; वातावरण बदलाचा परिणाम

दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी अशा वातावरणामुळे अनेकांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्यात हवाप्रदूषणाचीही भर पडली आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगा वाढू लागल्या आहेत.

नवी मुंबई शहरात मागील काही दिवस वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे आजारी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः डोकेदुखी, ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. सकाळी व सायंकाळी अचानक थंडी जाणवत आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे नागरिकांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहात आहेत. तर, रात्रीच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच दिवसात दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. त्यातच शहरातील अनेक विभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामध्ये खाडीलगतच्या भागांचा अधिक समावेश आहे. खारफुटीमध्ये वाढलेले हे डास संध्याकाळच्या वेळी लोकवस्तीमध्ये घुसत असल्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे दवाखाने, रुग्णालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. विशेषत्वाने उद्यानालगतच्या रहिवासी भागांत संध्याकाळच्या वेळी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर धुरीकरण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

ऑक्टोबर हीट, त्यात प्रदूषणात झालेली वाढ यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. हिवाळाही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यानी सूर्य उगवल्यावर जावे. वातावरण स्थिर झाल्यावर हा त्रास कमी होऊ शकेल.

डॉ. प्रशांत जवादे, मुख्य आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका
Exit mobile version