पत्रकार संघाकडून कठोर कारवाईची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरामध्ये अति वेगाने दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी महाड पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे. शहरामध्ये भर बाजारपेठेतून भरधाव दुचाकी चालवणाऱ्यांची संख्या वाढली असून याबाबत वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
महाड शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असतानाच बेशिस्तपणे वाहन पार्किंगच्या समस्येलादेखील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच भर बाजारपेठेतून धूम स्टाईलने दुचाकी आणि चारचाकी चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच, काही दिवसांपूर्वीच शहरातील महाड बेकरीजवळ अशाच पद्धतीने अपघात झाला होता. या अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी चालवणारा चालक मात्र अल्पवयीन असल्याचे समोर आले होते. अशाच पद्धतीने महाड शहर महामार्गावर अल्पवयीन आणि वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या मुलांकडून तसेच मुलींकडून खुलेआम वाहने चालवली जात आहेत. ही वाहने चालवताना वेगाचे नियंत्रण ठेवले जात नाही.
महाड शहरामध्ये अशा धूम स्टाईलने वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी आळा घालण्यासाठी त्यांच्या पालकांवर कारवाई केली जावी, अशा प्रकारची मागणी महाड पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी दोनच पोलीस शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना शहरामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी केवळ दोनच पोलीस कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एक पोलीस तर अन्य ठिकाणी एक पोलीस उभा असतो. या वाहतूक पोलिसांकडून केवळ शहरांमध्ये येणाऱ्या आणि दापोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना टार्गेट केले जात आहे.
परिवहन विभागाच्या नियमांचे तीनतेरा महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून वाहन चालवताना अनेक नियम आणि अटी घालण्यात येतात. मात्र, वाहन चालकांकडून या नियमांचे पालन केले जात नाही. अनेकांकडे वाहन चालवायचे परवानेच नसतात तर काळया काचांमधून फिरणारेदेखील अनेकजण दिसून येतात. महाडमध्ये महिन्यातून एक वेळा परिवहन विभागाचा कॅम्प असतो. मात्र, या ठिकाणी एजंटांच्या माध्यमातून हे सर्व परवाने देण्याचे काम केले जात असल्याने नियमांचे काटेकोर पालन केले जात नसल्याचे दिसून येते.