। पुणे । वृत्तसंस्था ।
पुणे शहरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आत्तापर्यंत झिकाचे तब्बल 66 रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक म्हणजे यात 26 गर्भवती महिलांचा समावेश आहे. त्यामुळे झिका रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरातील झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांची संख्या आत्तापर्यंत 66 वर पोहोचली आहे. तर, आत्तापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक म्हणजे यात 26 गर्भवती महिलांचा समावेश आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिला, लहान मुले आणि वृध्दांना आहे. त्यामुळे झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जात आहे.
नागरिकांनी स्वतःसह लहान मुलांची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. तर, ताप, पुरळ, अंगदुखी, सांधेदुखी, अंगाला सूज येणे इत्यादी लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.