चिरनेर परिसरात पशुपक्ष्यांच्या शिकारीत वाढ

वनविभागाकडून उपाययोजनांची मागणी
| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर तसेच अन्य परिसरात वन्यप्राणी पशुपक्ष्यांच्या शिकार करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अनेक हौशी शिकारी त्यांच्याकडील बंदूका तसेच विविध गावठी उपायांनी ही शिकार करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील वन्यप्राणी, पशु- पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

दरम्यान, या जंगल भागातील केळ्याचा माळ या आदिवासीवाडीवर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली असता, त्या वाडी तील आदिवासींनी वन्य जीवांच्या शिकारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात मोर व लांडोर या पक्ष्यांचा स्वच्छंदी वावर आहे. या लांडोर व मोर जातीच्या पक्ष्यांनादेखील हे शिकारी लक्ष करीत आहेत. अशीच अवस्था इतर वन्यप्राण्यांचीदेखील आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर परिसर हा डोंगराळ भाग आहे. या तालुक्यातील अनेक गावे ही डोंगर व जंगल भागात वसलेली आहेत. शासकीय संरक्षित जंगलांबरोबर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास येथे असल्याने या भागात कायम जंगली प्राण्यांचे अस्तित्व पाहायला मिळते. ससा, भेकर, रानडुक्कर या प्राण्यांपासून ते साळींदर, घोरपड हे प्राणी पाहायला मिळत आहेत. तर मोर, लांडोर या भागात सहज पाहायला मिळत आहेत.

उन्हाळी वणव्यांमुळे हे वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात, तर ऑक्टोबरपासून गावागावात केल्या जाणार्‍या पारधीमुळे या वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो. यामध्ये रानडुक्कर या शेतीसाठी उपद्रवी असलेल्या प्राण्याचा क्रमांक येतो. या प्राण्याच्या शिकारीसाठी येथील शिकारी केबलच्या तारेचे फास लावून, रानडुकराची शिकार करीत असतात. त्यासाठी या प्राण्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर धान्य टाकले जाते. त्या अमिषाने ही रान डुकरे लावलेल्या फासगीत अडकून पडतात. आणि, त्यानंतर त्यांची बंदुकीचा वापर करीत शिकार केली जाते.

उरण तालुक्यात विविध उपायांनी भेकर तसेच अन्य प्राण्यांचीदेखील शिकार होत असल्याची चर्चा सुरू आहे. आता हिरव्यागार माळरानावर बागडणार्‍या मोर व लांडोरीची शिकार होत आहे. दरम्यान, वनविभागाचे याबाबत जाणीवपूर्व दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतीत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून, उरण तालुक्यात वन्यप्राणी पशुपक्षी यांच्या होणार्‍या शिकारीच्या विरोधात उपाययोजना कराव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

Exit mobile version