वीज चोरीच्या घटनेत वाढ

| उरण | वार्ताहर |

वाढत्या उष्णतेमुळे वीजेची मागणी वाढली आहे. त्यातच उरण शहर तसेच गाव परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वीज चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज चोरीचा भार हा प्रामाणिकपणे वीजेचा वापर व वीज बिल भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

महावितरण कंपनीच्या माध्यमातून उरण नगर परिषद, द्रोणागिरी नोड, मालाची हाताळणी करणारे गोदाम, फार्म हाऊस, ढाबा, हाँटेल तसेच ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. सध्या उष्णतेमुळे उकाडा वाढला आहे. अशा वाढत्या उष्णतेच्या उकाड्यामुळे वीजेची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा फायदा उठवत महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी विज मीटरमध्ये हेराफेरी करून व्यवसायिकांना, गावातील श्रीमंत व्यक्ती तसेच गाव पुढाऱ्यांकडून आर्थिक हित जोपासत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्याची भूमिका बजावत आहेत. तसेच, महावितरण कंपनीचे कर्मचारी हे आपआपल्या घरात चोरीची विज वापरत आहेत. एकंदरीत त्यांनी वापरात आणलेल्या विजेचा बोजा हा सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. तरी विज चोरीला लगाम घालण्यासाठी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सर्व सामान्य विज ग्राहक करत आहेत.

Exit mobile version