| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल संस्थांनी आज सकाळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर करण्यात आली आहे. वाढलेले नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरवर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.
गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्येही गॅस सिंलेडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत 2024 मध्ये गॅस सिलिंडरच्या किमती दोनदा वाढवण्यात आल्या आहेत. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता 1795 रुपये झाली आहे. त्याचबरोबर आता मुंबईत 1749 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे. कोलकातामध्ये आता व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1911 रुपये झाली असून चेन्नईमध्ये हा सिलिंडर सुमारे 1960.50 रुपयांना मिळणार आहे.