| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अशातच सभा, प्रचार यांना सुरुवात झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभे दरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपचे चंद्रपूरचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोदींच्या प्रचारसभेवेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवर पोस्ट करत, निवडणूक आयोगाला टॅग करून मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पोस्टवर उत्तर देत निवडणूक आयोगाने ‘आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे’ असे सांगितले आहे. निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तर्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. ‘एका भावाला बहिणीबरोबर’ सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच ‘आप’च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा आहे.