निराधार वृद्ध महिलेला भरदुपारी लुटले
| उरण | वार्ताहर |
चिरनेर गावातील वृद्ध महिला रंगुबाई मधुकर चिर्लेकर ही बाजारातील किराणा दुकानातून सामान घेऊन आपल्या घरी जात असताना, गजबजलेल्या रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून आपल्या मोटारसायकलवरून पोबारा केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.28) भरदुपारी 12 च्या सुमारास घडली.
दोन दिवसांपूर्वी मोठे भोम येथे एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न केला होता.त्या प्रकरणाचा तपास लागत नाही तोच शनिवारी चिरनेर गावातील बाजारातील किराणा दुकानातून सामान घेऊन दुपारी ठिक 12 च्या सुमारास रंगुबाई चिर्लेकर या आपल्या घरी जात असताना, महाराष्ट्र बँकसमोर दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून आपल्या मोटारसायकलवरून पोबारा केल्याची घटना घडली आहे.
यावेळी या महिलेने आरडाओरडा केली असता, काही नागरिकांनी चोरांचा पाठलाग केला. परंतु, या चोरट्यांनी आपल्या मोटारसायकलवरून धूम ठोकली. त्यामुळे रहिवासी विशेष करुन महिला वर्ग भयभीत झाले आहेत. चिरनेर परिसरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या चोरट्यांचा पोलीस यंत्रणेने शोध घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.