नागरी आरोग्य केंद्र सुरू, नागरिकांसाठी आरोग्य विभागाच्या सूचना
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महापालिका क्षेत्रात महिन्याभरात 3,794 जणांना ताप, डोकेदुखी, सर्दी व खोकला या आजाराच्या रुग्णांची नोंद झाली असून, हा आजार संसर्गजन्य असल्याने घरात स्वच्छता आणि गर्दीत जाणे टाळा अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांसाठी दिल्या आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने रविवारीसुद्धा नागरी आरोग्य केंद्र सुरू ठेवले आहेत.
मागील वर्षी 23 मे ते 23 जून या दरम्यान महापालिका क्षेत्रात 3,649 रुग्ण या आजाराचे आढळले होते. मागील वर्षीपेक्षा याच महिन्यात 145 रुग्ण वाढल्याने महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी यासंदर्भात आरोग्य विभागाची नुकतीच बैठक घेतली. ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणे आढळल्यास तातडीने नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. तसेच साथीचे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या idsppanvelcorporation@gmail. com या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. आकाश ठसाळे यांनी केले आहे.
पालिकेचे आवाहन
ताप, सर्दी आदी आजार टाळण्यासाठी उकळलेले पाणी प्यावे, स्वच्छ अन्न सेवन करावे, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी साचलेले पाणी हटवावे व पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. फुलदाणी, वॉटरकूलर यामधील पाणी आठवड्यातून एकदा काढून कोरडे ठेवावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले.






