नागोठण्यात चोरीच्या घटनांत वाढ

सलग दुसऱ्या दिवशी दोन ठिकाणी घरफोडी

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठण्यातील मोहल्ला भागात असलेल्या दोन वेगवेगळ्या इमारतीमधील बंद असलेले एकूण पाच फ्लॅट फोडून लाखो रुपयाचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि.2) रात्री नागोठण्यातील रमाई नगर येथील बंद असलेल्या दोन घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचे दागिने व रोकड लंपास केले. नागोठण्यात लागोपाठ दोन दिवसात घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

मंगळवारी घडलेल्या चोरीच्या दुसऱ्या घटनेत नागोठण्यातील रमाई नगर येथील कौटुंबिक कारणास्तव मुंबई येथे गेलेल्या विजय शिर्के व जिंदाल कंपनीत रात्रपाळीला गेलेल्या सचिन गायकवाड यांच्या बंद असलेल्या घरांना चोरांनी लक्ष करून सोन्याच्या दागिन्यांचा लाखो रुपयांचा ऐवज व रोकड लंपास केली आहे.

या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागोठणे रमाई नगरमधील रहिवासी विजय धर्मा शिर्के हे लग्न कार्यानिमित्त मुंबई येथे सहकुटुंब गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील 3 सोन्याची चैन, 5 सोन्याच्या अंगठ्या, लहान मुलांचे 4 सोन्याचे लॉकेट, अर्धा किलो चांदी व 16 हजार रुपयाची रोख रक्कम चोरुन नेली. तसेच सचिन गायकवाड हे कामाला गेले होते. त्यामुळे त्यांची पत्नी आपल्या लहान बाळासह रमाई नगरमध्येच राहत असलेले त्यांचे दीर संतोष गायकवाड यांच्या घरी गेल्या होत्या. त्यामुळे गायकवाड यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी कुलूप तोडून त्यांच्या घरात असलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, 1 सोन्याचा हार, 2 सोन्याची चैन, गंठणचे सोन्याचे पान, सोन्याची बोरमाळा, सोन्याच्या माळ्यांची माळ, सोन्याच्या 4 अंगठ्या, सोन्याचे कानातील 4 छोटे जोड, सोन्याचे कानातील 4 मोठे जोड, सोन्याचे मोठे पान, चांदी 1 किलो, 50 हजार रुपये रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

नागोठण्यातील चोरीच्या या दोन्ही घटनांचा तपास करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू करण्यात आले असून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन सखोल तपासणी केली. तसेच याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः तपास करीत आहेत.

Exit mobile version