| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात महिला फुटबॉलमध्ये मोठी प्रगती होत आहे. महिला खेळाडूंच्या नोंदणीत गेल्या दोन वर्षांत तब्बल 138 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. तरुण महिला खेळाडूंचा फुटबॉलकडे अधिक ओढा असल्याचे स्पष्ट होत आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या खेळाडू नोंदणी आकडेवारीनुसार मार्च 2024 पर्यंत 27,936 महिला खेळाडूंनी नोंदणी केली. जून 2022 मध्ये ही संख्या 11,724 इतकी होती. आपल्या देशातील ही आकडेवारी महिलांमध्ये फुटबॉल किती लोकप्रिय आहे हे दर्शवत आहे, असे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी सांगितले.
संघटना म्हणून महिला फुटबॉलसाठी आम्ही करत असलेले प्रयत्न योग्य ट्रॅकवर आहे. आमच्या ‘इकोसिस्टी’मध्ये सध्या 16,212 महिला खेळाडू आहेत, अशी माहिती चौबे यांनी दिली. 2023-24 या मोसमासाठीही भारतीय महिला लीग तयार केली आहे. या व्यतिरिक्त द्वितीय श्रेणीही आम्ही निर्माण केली आहे. याचा निश्चितच फायदा महिला फुटबॉलपटूंना होणार आहे, असेही चौबे यांनी सांगितले. चौबे पुढे म्हणाले, या महिला लीगचे थेट प्रक्षेपण होते, ते पाहून अनेक नवोदित मुलींचा ओढा फुटबॉलकडे वाढला आहे. 2022-23 च्या महिला लीगमध्ये 16 संघ होते. परंतु, ही लीग अहमदाबाद या एकाच ठिकाणी झाली होती. परंतु, यंदा हे 16 संघ होम आणि अवे धर्तीवर खेळणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना स्थानिक महिला खेळाडूंना प्रोत्साहित करू शकतात. गतवेळच्या स्पर्धेत गोकुलम केरळा एफसी संघाने विजेतेपद मिळवले. ओडिशा एफसी संघाचे वर्चस्व त्यांनी मोडून काढले होते. द्वितीय श्रेणीच्या लीगमध्ये 15 क्लबचे संघ असतील. यातील सहा संघ अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरतील.