महिला टी-20 विश्वचषक बक्षिसांच्या रकमेत वाढ

विजेत्या संघाला मिळणार तब्बल 2.35 मिलियन डॉलर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

महिला टी-20 विश्‍वचषक 2024 ला 29 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. आयसीसीने 2024 च्या महिला विश्‍वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी युएईला दिली आहे. पहिला सामना 3 ऑक्टोबरला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, यादरम्यान आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे.

आयसीसीने चॅम्पियन संघ आणि उपविजेता संघाला किती बक्षिस रक्कम मिळणार हे जाहीर केले आहे. आयसीसीने 2024 च्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मागील विश्‍वचषकाच्या तुलनेत वाढ केली आहे. आयसीसीने 2024 महिला टी-20 विश्‍वचषक स्पर्धेची बक्षीस रक्कम 79,58,080 डॉलर्सपर्यंत वाढवली आहे, जी गतवर्षीच्या विश्‍वचषकाच्या तुलनेत दुप्पट आहे. महिला टी-20 विश्‍वचषक 2024 च्या विजेत्याला तब्बल 2.35 मिलियन डॉलर मिळतील, जे 2023 मध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला दिलेल्या 1 मिलियन डॉलरपेक्षा 134 टक्क्यांनी अधिक आहेत. उपविजेत्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे. उपविजेत्या संघाची बक्षीस रक्कमही गेल्या विश्‍वचषकाच्या तुलनेत वाढली आहे. यंदा विजयी होणार्‍या संघाला 1.17 मिलियन डॉलर रक्कम दिली जाईल. उपांत्य फेरीत पोहोचणार्‍या संघाला 6,75,000 डॉलर इतकी रक्कम मिळेल. तर गट सामने जिंकणार्‍या संघाला 31,154 डॉलर्स इतकी रक्कम मिळेल. यंदा महिला टी-20 विश्‍वचषक 2024 मध्ये 10 संघ सहभागी होत आहेत. प्रत्येकी 5 संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे महिला संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज या महिला संघांचा समावेश आहे. गट टप्प्यातील शेवटचा सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल, तर दोन्ही गटातील टॉप-2 संघ थेट उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्‍चित करतील. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी शारजाहच्या मैदानावर खेळवले जातील, तर स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.

Exit mobile version