आंबा, काजू बागायतदारांकडून फवारणीची तयारी
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
पावसाळा ओसरल्यानंतर आता कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारी पट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळीचा झालेला शिडकावा आणि मळभाचे वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. आंब्यासह काजू बागायतदारांनी थंडीच्या चाहुलीने आता फवारणीची जुळवाजुळव सुरू केली आहे.
दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात संध्याकाळी हलका पाऊस झाला. या पावसात सातत्य राहिल्यास आंबा आणि काजू हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने आणलेल्या अडचणीने येथील बागायतदार हैराण होता. त्यात थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याचीही भीती होती. मात्र आता थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. सकाळी आणि रात्री हलका गारवा पडू लागला आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थंडीचा कालावधी लांबला होता. त्यामुळे शहरासहीत ग्रामीण भागातही उकाड्याचा प्रभाव होता. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणार्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली असून, पहाटे गारवा जाणवू लागला आहे. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात पहाटे 28 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सकाळी ते अर्ध्या अंशाने वाढले होते. दुपारी मात्र तापमान 30 अंशांवर होते. मात्र, वातावरणात हलका गरावा होता त्याला ताशी वीस ते 25 किमीने वाहणार्या वार्याचीही साथ मिळाल्याने गारवा दुपारीही सुखद वाटत होता.