उन्हाळी कपड्यांना वाढती मागणी

| पनवेल । वार्ताहर ।

एप्रिल महिना सुरू झाला तशी दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. या कडाक्याच्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे नवी मुंबईकरांना नकोसे होऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. उन्हाळ्यातील तीव्र सूर्यकिरणांचा त्वचेवर घातक परिणाम होण्यासही सुरुवात झाली असल्याने त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनकोट, रुमाल, हातमोजे यांची मागणी वाढू लागली आहे.

वाढत्या उन्हामुळे नवी मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून, एप्रिल महिन्यातच लोक हैराण झाले आहेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शहरवासीयांची पावले रसाची दुकाने, कापड मार्केट याकडे वळू लागली आहेत. कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले असून कडक उन्हामुळे त्वचा रापत, काळी होत आहे. त्यामुळे त्वचेचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे रुमाल, सनकोट, हातमोजे, सनस्क्रिन लोशन घ्यायला गर्दी होत आहे. याबरोबरच लोक दुपारी घरातून बाहेर निघण्याचे टाळत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.

Exit mobile version