न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खोपोली येथील निर्घृण हत्या प्रकरणातील दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे दोघांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.
खोपोली येथील नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी (दि.26) सकाळी भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेत मंगेश काळोखे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहाहून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी खुनाचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासांतच नऊ जणांना ताब्यात घेतले. मात्र, आरोपी म्हणून असणारे सुधाकर घारे व भरत भगत यांनी अटकपूर्व जामिनासाठी पनवेल येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश चव्हाण यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. घारे यांच्यावतीने ॲड. शिरीष गुप्ते व ॲड. थोरात यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षातर्फे यशवंत भोपी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने या दोन्ही आरोपींच्या कायदेशीर अडचणीत मोठी वाढ झाली असून, पुढील तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.







