भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व अनादिकालापासून आहे. जी गावे, शहरे नद्यांच्या काठावर वसलेली आहेत, ती शहरे, गावे सुखीसंपन्न म्हणून ओळखली जातात. बारमाही वाहणार्या नद्यांमुळे या परिसरातील जमीन नेहमीच सुपीक होत राहिलेली आहे. दुर्दैवाने आता याच नद्यांना प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. कारण, महाराष्ट्रात सर्वच नद्यांचे वाढलेले प्रदूषण हा चिंतेचा आणि गांभीर्याने घेण्याचाच विषय बनले आहे. अगदी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपुरातील चंद्रभागा आणि नाशिक येथील गोदावरी नदीचे पाणी मानवी जीवनास पिण्यास अयोग्य असल्याचे जाहीर केलेले आहे. हे अतिशय गंभीरच म्हटले पाहिजे. कारण, पंढरपूर असो वा नाशिक, ही महाराष्ट्रातील नामांकित तीर्थक्षेत्रे. दरवर्षी या तीर्थक्षेत्रांना लाखो भाविक भेट देत असतात. पंढरीतून वाहणार्या चंद्रभागेत अथवा नाशिकमधील गोदावरीच्या पाण्यात स्नान करणे, एकप्रकारे पुण्य समजले जाते. पण, आता हेच पाणी मानवाच्या जीवावर उठले आहे. कारण, वाढत्या प्रदूषणाने या दोन्ही नद्यांचे पाणी मानवी जीवनास अपायकारक असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय हरित लवादाने काढला आहे. नुकत्याच झालेल्या माघी एकादशीच्यावेळी चंद्रभागेच्या पात्रातील सर्व पाणी बाहेर काढून नव्याने पाणी सोडण्यात आले होते. तरीही ते पाणी प्रदूषति झाल्याचे दिसून आलेले आहे. दरवर्षी या तीर्थक्षेत्रांना भेटी देणार्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. त्यामुळे तेथील सांडपाण्याची व्यवस्थेची अतिशय दुरवस्था झालेली आहे. दरवर्षी आषाढी, कार्तिकी यात्रांना सरकारतर्फे हजारो शौचालयांची निर्मिती करते. पण, ती व्यवस्थाही अपुरीच पडते. त्यामुळे ते सर्व सांडपाणी चंद्रभागेच्या पात्रातच मिसळते आणि त्याचा परिणाम हा नदीचे पाणी प्रदूषित होण्यावर होत राहतो. या दोन नद्यांची ही अवस्था अशी, तर अन्य नद्यांची स्थिती काय असेल, हे सांगणे कठीणच. रायगड, कोकणातील नद्याही याला अपवाद ठरणार्या नाहीत. कारण, रायगडातील सावित्री, कुंडलिका, अंबा, भोगावती, गाढी, पाताळगंगा या प्रमुख नद्यांचेही पाणी प्रदूषित झाल्याचे वेळोवेळी उघडकीस आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्टी, जगबुडी या नद्यांची अवस्थाही अशीच आहे. कारण, या नद्यांच्या काठावरच विविध रासायनिक कंपन्या आपले बस्तान बांधून बसलेल्या आहेत. या रासायनिक कंपन्यांतून दररोज लाखो लीटर्स पाणी नद्यांच्या पात्रात बिनदिक्कतपणे सोडले जाते. त्याचा विपरित परिणाम मानवी जीवनावर होतोच. शिवाय, नद्यांच्या पात्रात असलेल्या जैवविविधतेवरही याचा विपरित परिणाम होताना दिसतोय. दरवर्षी या नद्यांच्या पात्रात लाखो मासे मृतावस्थेत पडलेले आढळतात. शिवाय, कृषीक्षेत्रावरही याचा मोठा दुष्परिणाम झाल्याने लाखो हेक्टर शेती नापिक बनत चालली आहे. फळबागांचे उत्पादनही दरवर्षी घटताना दिसत आहे. याला सर्वस्वी नद्यांचे वाढते प्रदूषणच कारणीभूत आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हेतूत: होत असलेले दुर्लक्षच कारणीभूत ठरत आहे. प्रदूषण करणार्या कंपन्यांवर थातुरमातुर कारवाई करण्यापलिकडे हे मंडळ काहीच कारवाई करु शकत नाही. अनेकदा राजकीय लागेबांधेमुळे त्या कंपनीवर कारवाई करण्यासही टाळाटाळ होत राहते. हे अनेकदा घडलेले आहे. त्यामुळे प्रदूषण कसे रोखायचे, हा एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी ‘नमामि चंद्रभागा, नमामि गोदावरी, नमामि गंगा’ अशी मोहीम राबविली खरी; पण त्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास केंद्र आणि राज्य सरकारला यश आलेच नाही. उलट, डोळ्यादेखत पवित्र नद्या प्रदूषित होत राहिल्या. कोकणातील सर्वच नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. पण, वाढत्या प्रदूषणाने या मासेमारीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसत आहे. कारण, या मत्स्यव्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पण, प्रदूषणाने मत्स्य उत्पादनच घटल्याने मासेमारी घटली आहे. हे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये घडताना दिसतेय. ऐन पावसाळ्यात तर कंपन्यांचे प्रदूषित पाणी थेट नदीच्या पात्रात सोडले जाते. ते पाणी समुद्रास मिळत असल्याने सागरालाही प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. वास्तविक, पावसाळ्यात मासेमारी बंद असते. हा काळ मत्स्य प्रजननानाचा ओळखला जातो. पण, वाढत्या प्रदूषणाने या प्रजननावरही विपरित परिणाम होताना दिसतो. हे कुठेतरी थांबले तरच नद्यांचे होणारे प्रदूषण रोखले जाईल, अन्यथा भविष्यात या नद्या पवित्र सोडाच; अपवित्र, म्हणजे प्रदूषित झालेल्या असतील, हे नाकारता येणार नाही.






