लाकडी घाण्याच्या तेलाकडे वाढता कल

| पनवेल | प्रतिनिधी |

दिवाळी सण हा गोडाधोडाचा सण. या सणाला मोठ्या प्रमाणात मिष्टान्न व तळलेले पदार्थ बनवले व खाल्ले जातात. त्यामुळे दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचा वापर केला जातो. मात्र, आता आरोग्याविषयी सजगता आल्यामुळे गृहिणींचा लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाकडे कल वाढला आहे.

शरीर प्रकृतीसाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत, कोणते तेल खाणे योग्य याचा लोक कटाक्षाने विचार करू लागले आहेत. त्यातच बाजारात अनेक प्रकारचे खाद्यतेल विक्रीला आहेत. तरीही सध्या पारंपरिक पद्धतीच्या लाकडी घाण्यापासून बनवलेल्या तेलाची विक्री होत आहे. हृदयरोग आणि आजारासंबंधी इतर जनजागृतीमुळे लाकडी तेल घाणा उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. कोल्ड प्रेस ऑईल खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे कामोठा, खारघर, पनवेल व कळंबोलीत लाकडी तेल घाण्यावर ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.

वाढत्या आजारांमुळे जागृती
बदलती जीवनशैली, खाद्यसंस्कृतीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. तरुणाईही या आजारातून सुटलेली नाही. अशा परिस्थितीत नागरिक जागृत होऊन तसेच दूरदृष्टी ठेवत आता सेंद्रिय भाजीपाला, त्याचबरोबर निर्भेळ वस्तूंचा उपयोग करत असल्याचे चित्र आहे.
Exit mobile version