। पॅरिस। वृत्तसंस्था।
बॅडमिंटन कोर्टवर लक्ष्य सेनचा अविश्वसनीय खेळ पाहायला मिळाला. बिगरमानांकित लक्ष्यने त्याच्यासमोर येणार्या प्रत्येक तगड्या प्रतिस्पर्धीला तो सहज चितपट करत आहे. पण, बुधवारी त्याने तिसर्या मानांकित आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या जॉनथन ख्रिस्टी याला पराभवाचा धक्का दिला.
पहिल्या सेटमध्ये 2-8 अशा पिछाडीवर असलेला लक्ष्य न खचता मोठ्या धैर्याने प्रतिस्पर्धीचा मुकाबला करताना दिसला. अविश्वसनीय बचाव अन् तितकाच कौशल्यपूर्ण आक्रमणाच्या जोरावर लक्ष्यने जॉनथनला सैरभैर केले. पहिला सेट 21-18 असा जिंकून त्याने सामन्यावर पकड घेतली. पण, तरीही तो निर्धास्त झाला नाही, त्याचे ध्येय हे विजय मिळवणे हेच होते आणि त्यासाठी त्याने इंडोनेशियाच्या खेळाडूला संघर्ष करण्यास भाग पाडले.
लक्ष्यने मारलेला बॅकहँड परतीचा फटका सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. हा फटका त्याच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा ठरला. त्याने दुसर्या सेटमध्ये 21-12 अशी बाजी मारताना उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि त्याच्यासमोर भारताच्या एचएस प्रणॉयचे आव्हान असण्याची दाट शक्यता आहे.