मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई
| चिरनेर | प्रतिनिधी |
मत्स्य उत्पादन वाढीसाठी शासनाने पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घातलेली असतानाही या बंदीची पायमल्ली करून अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या सात मच्छिमार बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या बोटी पुढील दंडात्मक कारवाईसाठी विविध बंदरांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतर (भाप्रसे), सहआयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक उपायुक्त नवनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली उरण परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पावसाळी काळात मासेमारीला शासनाने बंदी घातली आहे. या कालावधीत मासेमारी केल्यास समुद्रातील मत्स्यसंपदेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने बंदी लागू करण्यात येते. मात्र, बंदी असतानाही काही मच्छिमारांकडून चोरट्या मार्गाने समुद्रात जाऊन अनधिकृत मासेमारी सुरू असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले. यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने समुद्रात गस्त वाढवून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटींची तपासणी सुरू केली. या कारवाईदरम्यान आतापर्यंत एकूण सात मच्छिमार बोटी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
यामध्ये दर्शन अमरनाथ (मालक- सोमनाथ नारायण कोळी), तुंगा (मालक-भावसिंग वाळू राठोड), गंगा (मालक- श्रीनिवास गंगाराम राठोड), उमा गौराई (मालक-हरेश्वर शिवाजी कोळी), आई भवानी (मालक-गणेश लालू राठोड), लक्ष्मी नारायण (मालक-विनोद नरेश राठोड), विघ्नहर्ता (मालक- जयश्री हिराजी कोळी) या सात मच्छिमार बोटींचा समावेश असल्याची माहिती उरण परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या मच्छिमार बोटी पुढील दंडात्मक कारवाईसाठी विविध बंदरात ठेवण्यात आलेल्या आहेत.
बंदी मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
पावसाळी मासेमारी बंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बंदीच्या कालावधीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमध्ये विभागाच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
