छप्पर उडालेले कार्यालय दुरूस्तीच्या प्रतिक्षेत
। माणगाव । प्रतिनिधी ।
चार वर्षांपूर्वी आलेल्या चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाला इत्यंबुत माहिती पुरवून आर्थिक मदत मिळवून दिली. त्यामुळे अनेकांच्या घरावरील उडालेले छपरे उभारली गेली.
मात्र चार वर्षांपूर्वी चक्रीवादळात उडालेले इंदापूर येथील तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयाच्या छप्पराची दुरुस्ती केली नसल्याने तलाठी कार्यालय भाड्याच्याच खोलीत सुरु असून हे कार्यालय शोधताना लाडक्या बहिणीची चांगलीच दमछाक होत आहे. इंदापूर येथील ऐतिहासिक दगडाच्या बांधकामात असणारी जुनी इमारत बस स्थानकाच्या पाठीमागे शेकडो वर्षांपासून उभी आहे. या ठिकाणी पूर्वी इंदापूर पोलीस दूरक्षेत्र चालत होते. या इमारतीच्या पटांगणात दोन तोफा आजही उभी आहेत. त्यामुळे हि वास्तू इतिहासाची साक्ष देत असून याच इमारतीत महसूल गोळा केला जात होता. त्यामुळे पोलीस चौकी व महसूल हि दोन्ही खाती इंग्रज सरकारच्या काळापासून असावीत अशी नागरिकात चर्चा आहे. या इमारतीतील पोलीस दूरक्षेत्र इंदापूर येथील दुसर्या जागेत 8 वर्षांपूर्वी स्थलांतरीत केल्याने तेथे महसूल खात्याची मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालये सुरु होती. चक्रीवादळात या कार्यालयावरचे छप्पर उडून गेल्याने चार वर्षात शासनाला छप्पर बसाविण्यासाठी निधी मिळवता आला नाही.