सरकारी कर्मचार्‍यांचा बेमुदत संप सुरूच

| मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी कालपासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाला मुरुड तालुक्यात मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यानंतर बुधवारी दुसर्‍या दिवशी संप सुरूच असून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही,असे प्रतिपादन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मुरूड तालुका अध्यक्ष रिमा कदम यांनी संपात सहभागी असणार्‍या कर्मचार्‍यांसमोर व्यक्त केले. संपातून कोणीही माघार घेतली नसल्याचे स्पष्ट करुन अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले.

शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले. यामध्ये तालुका पंचायत समिती अंतर्गत 275 कर्मचार्‍यांपैकी 126,नगरपालिकेतील 44 जण संपात सहभागी आहेत. संप दुसर्‍या दिवशी सुरू असून तोडगा न निघाल्यास नागरिक आणि ग्रामस्थांची सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी व्यक्त केली. संप असाच सुरू राहिल्यास सर्व कामकाज ठप्प होईल असे ठिकठिकाणी फिरताना अनेकांनी स्पष्ट केले आहे.जरी क आणि ड या श्रेणीतील कर्मचारी संपात मोठ्या प्रमाणात सामील असले तरी सरकारी कर्मचार्‍यांचा एवढा मोठा संप प्रथमच होत असल्याच्या प्रतिक्रिया बुधवारी ठिकठिकाणी फिरताना ऐकायला मिळत होत्या.

एकूणच सुमारे 300 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.सनदशीर मार्गाने आम्ही सर्व हा संप करीत असून आमच्या प्रलंबित अति आवश्यक मागण्या शासनाने मान्य कराव्यात.

रीमा कदम
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मुरूड तालुका अध्यक्ष

शासकीय कार्यालये रिकामी

| उरण । वार्ताहर ।

उरण नगर परिषद कार्यालय समोरच बसून आपला संप सुरु केला. संपाचा दुसरा दिवस आहे. तरीही मागण्या मान्य न झाल्याने अधिकारी कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. संपूर्ण कामकाज बंद करून यावेळी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वर्ग या संपात सहभागी झाले होते.


उरणमध्ये उरण नगर परिषद कार्यालयासमोर सुरु असलेल्या संपात उरण नगर परिषद स्थानिक संघटनेचे अध्यक्ष संतोष तेलंगे, उपाध्यक्ष मिलिंद जाधव, संतोष गुडेकर, संजय पवार, आकाश कवडे, संजय दाते, रमेश सरवदे, नितीन कासारे, नितिन कांबरे, अनिल जगधनी, झुंबर माने, सुलोचना हलसे, देवयानी गोडे, मनिषा उमटे, भारती कारंगुटकर, रशिदा शेख, कांचन तारेकर, धनंजय थोरात, राजेश कदम, संजय डापसे, हरेश तेजी, सचिन भानुसे, जयराम पाटील, संतोष कांबळे , विजय पवार, संजय परदेशी, धनेश कासारे, अनिल कासारे यांच्यासह – उरण नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version