कळंबोली वसाहतीमधील चारही प्रभागात प्रचार सुरु
| पनवेल | प्रतिनिधी |
एकीकडे युती का आघाडी या संभ्रमात राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असताना कळंबोली वसाहतीमधील चारही प्रभागात अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आगामी पनवेल पालिकेच्या निवडणुकीला राज्यातील सत्तेत सहभागी असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे युती म्हणून समोरे जाणार की नाही, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि काँग्रेस, मनसेच्या आघाडीचीदेखील अद्याप घोषणा झालेली नसल्याने सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. मात्र, त्याचवेळी कळंबोली वसाहती अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
पनवेल पालिका हद्दीत एकूण 20 प्रभाग असून, काही प्रभागात चार तर काही प्रभागात 3 सदस्य याप्रमाणे एकूण 78 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे.
चिन्हाशिवाय प्रचार
पालिका निवडणुकीसाठी 23 डिसेंबरपासून 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. 31 डिसेंबरला नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने 3 जानेवारी रोजी चिन्ह वाटप करून त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची घोषणा केली जाणार असली तरी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी चिन्हाशिवाय प्रचाराला सुरुवात केली आहे.







