मालिका जिंकण्यासाठी भारत, आफ्रिकेत चुरस

केपटाऊनमध्ये तिसरी कसोटी मंगळवारपासून
केप टाऊन | वृत्तसंस्था |
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील निर्णायक लढत केप टाऊनमध्ये होणार आहे. 11 जानेवारीपासून केपटाऊनच्या न्यू लँड्स मैदानावर उभय संघांमध्ये हा सामना होणार असून, त्यात दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण केप टाऊनच्या मैदानातील विजयी संघ मालिकेवर कब्जा करणार आहे
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. मालिकेतील शेवटच्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या खेळण्यावर सस्पेंस आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान सिराजला दुखापत झाली होती.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या म्हणण्यानुसार, सिराज त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवल्या जाणार्‍या अंतिम कसोटीसाठी तो उपलब्ध असेल, असे आम्ही खात्रीने सांगू शकत नाही. द्रविड म्हणाला

सिराज अद्याप पूर्णपणे फिट नाही. आम्ही त्याच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवून आहोत. तो किती फिट झाला आहे हे येत्या 4 दिवसांत कळेल. सिराज पूर्णपणे फिट असेल तरच तो केपटाऊन कसोटीत मैदानात उतरु शकतो.
राहूल द्रविड,मुख्य प्रशिक्षक

सिराजच्या दुखापतीमुळे रणनीतीत फरक
द्रविडने सिराजचे कौतुक करताना म्हटले की, ङ्गदुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावातही तो पूर्णपणे फिट नव्हता. असे असूनही त्याने गोलंदाजी केली. तो म्हणाला की, आम्ही त्याचा पुरेपूर वापर करू शकलो नाही, त्यामुळे दुसर्‍या कसोटीत आमची रणनीती थोडी बिघडली. केपटाऊन कसोटीपूर्वी टीम इंडियाची समस्या केवळ सिराजची दुखापत नाही तर हनुमा विहारीची दुखापतही आहे. द्रविडने सांगितले की, आतापर्यंत त्याच्या दुखापतीवर फिजिओशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे हनुमाची दुखापत किती गंभीर आहे हे तो सांगू शकत नाही.

केपटाऊनमध्ये निर्णायक लढत!
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग हा टीम इंडियाचा बालेकिल्ला होता. यजमानांच्या हातून येथे 7 गडी राखून नुकत्याच झालेल्या पराभवापूर्वी भारतीय संघ या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेतील पहिली कसोटी मालिका जिंकणे टीम इंडियासाठी कठीण झाले आहे. वास्तविक, तिसरी कसोटी केपटाऊनमध्ये आहे, जिथे भारताचा रेकॉर्ड खराब आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या मागील 5 पैकी 3 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. 2 सामने ड्रॉ झाले आहेत. म्हणजेच येथे एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. याचाच अर्थ भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय मिळवायचा असेल तर टीम इंडियाला केपटाऊनचा इतिहास बदलावा लागणार आहे.

Exit mobile version