भारताने विजयासह मालिकाही जिंकली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 मालिका विजयासह झिम्बाब्वे दौऱ्याचा गोड शेवट केला आहे. रविवारी (दि.14) झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने 42 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. पाचव्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेसमोर भारताने 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18.3 षटकातच सर्वबाद झाला. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 4 बळी घेतले.

झिम्बाब्वेची सुरूवातच खराब झाली होती. पहिल्याच षटकात मुकेश कुमारने वेस्ली मधेवेरेला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने ब्रायन बेनेटलाही 10 धावांवर बाद केले. त्यानंतर तादिवानाशे मारुमणी आणि डायन मायर्स यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

भारताकडून संजू सॅमसनने 45 चेंडूत 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच शिवम दुबे (27) आणि रियान पराग (22) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनीने 2 बळी घेतले. तसेच सिकंदर रझा, रिचर्ड एनगारावा आणि ब्रेंडन मावुता यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

Exit mobile version