भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना

19 वर्षांखालील एकदिवसीय विश्‍वकरंडक, पाक उपांत्य फेरीत बाद

| बिनोनी | वृत्तसंस्था |

काही महिन्यांपूर्वी मुख्य एकदिवसीय विश्‍वककरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा सामना झाला होता. आता 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हेच संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. या कुमार विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने अगोदरच अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले होते. आज झालेल्या दुसर्‍या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा अतिशय चुरशीच्या सामन्यात एक विकेट आणि पाच चेंडू राखून पराभव केला. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ एकदाही आमनेसामने आले नाहीत.

वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 179 धावांत गुंडाळले. त्यांच्या टॉम स्ट्राकर याने 24 धावांत 6 विकेट मिळवल्या. हा सामना ऑस्ट्रेलिया सहज जिंकणार, असे वाटत असतानाच त्यांना अखेरच्या षटकापर्यंत लढावे लागले. पाकिस्तानकडेही चांगले वेगवान गोलंदाज असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 1 बाद 33 अशी सावध सुरवात केली; परंतु लगेचच त्यांची 4 बाद 59 अशी घसगुंडी उडाली. 17 चेंडूंत त्यांनी तीन फलंदाज गमावले होते.

ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत येण्याची लक्षणे दिसत असताना सलामीवीर हॅरी डिक्सॉनने अर्धशतकी खेळी करून ऑलिव्हर पेकसह डाव सावरला. डिक्सॉन बाद झाल्यावर ऑलिव्हरने टॉम कॅम्पबेलसह सहाव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा विजय निश्‍चित केला, असे वाटत असताना ऑलिव्हर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने सातवा फलंदाज गमावला, त्या वेळी त्यांना विजयासाठी आणखी 25 धावांची गरज होती आणि तीनच विकेट शिल्लक होत्या. त्यानंतर अली राझाने दोन विकेट मिळवल्यामुळे सामन्यात रंग भरले. राफ मॅकमिलन याने अखेरच्या फलंदाज कॅलम विल्दर याच्यासह अखेरच्या विकेटसाठी 17 धावांची निर्णायक भागीदारी केली.

तत्पूर्वी पाकिस्तान संघाकडून अझान अवेस आणि अराफत मिनहास या दोघांनी अर्धशतके केली. त्यानंतर सर्वाधिक 20 धावा या अवांतरच्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 13 वाईड चेंडू टाकण्यात आले. चेंडू चांगल्याच प्रमाणात स्विंग होत असल्यामुळे चेंडू वाईड ठरत होते. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्टाकरने 26 धावांतच पाकचे सहा फलंदाज बाद केले. मुळात पाकिस्तानची अवस्था 5 बाद 79 अशी झाली होती. त्यांतर त्यांनी आणखी 100 धावांची भर घातली.

संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान : 48.5 षटकांत सर्वबाद 179 (अझान अवेस 52, अराफत मिनहास 52, अवांतर 20, माहिल बिअर्डमन 10-0-38-1, टॉम स्टाकर 9.5-1-24-6, टॉम कॅम्पबेल 6-0-23-1) पराभूत. 
ऑस्ट्रेलिया : 49.1 षटकांत 9 बाद 181 (हॅरी डिक्सॉन 50, ऑलिव्हर पेक 49, टॉम कॅम्पबेल 25, राफ मॅकमिलन नाबाद 19, उबेद शाह 10-0-44-1, अली राझा 10-2-34-4, अराफत मिनहास 10-1-20-2)
Exit mobile version